राज्यात माळढोक पक्षी उरले फक्त तीन ते पाच!

Dilip KurhadeEnvironment28/04/202546 Views

राज्यात माळढोक पक्षी उरले फक्त तीन ते पाच!
दुर्मिळ पक्ष्याला वाचविण्यासाठी कृत्रिम अंडी उबविण्याचा प्रयोग

पुणे :देशात अतिशय दुर्मिळ होत असलेल्या माळढोक पक्षी (ग्रेट इंडियन बस्टार्ड) अवघे तीन ते पाच उरले आहेत. या माळढोक पक्ष्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील नाणज हे संरक्षित अभयारण्य आहे. याठिकाणी माळढोकची अंडी कृत्रिमपणे उबविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय प्राणी सर्वेक्षण (ZSI) पुण्याचे प्रभारी अधिकारी, शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव त्रिपाठी यांनी दिली.

माळढोक हा भारतातील व पाकिस्तानातील कोरड्या प्रांतांत आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. याला इंग्रजीत ‘ग्रेट इंडियन बस्टार्ड’ म्हणतात. माळढोकची उंची चार फूट तर वजन तीस ते चाळीस किलो असते. याची संख्या राजस्थानमध्ये दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान आहे. माळढोकची शिकार आणि अधिवासाचा ऱ्हास यामुळे ही प्रजाती अतिशय संकटग्रस्त स्थितीत आहे. हा पक्षी १९७२ च्या वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याचे मुख्य खाद्य लहान व मोठे कीडे, टोळ, बिया, छोटी झुडपे इत्यादी आहेत. माळढोक वर्षातून एकदा एकच अंडे देतो. तेही उघड्यावर (जमिनीवर, झाडांच्या बुंध्याच्या आसपास, नांगरटीमध्ये) असते. त्यामुळे शिकारी पक्षी, भटकी कुत्री, घोरपड हे प्राणी माळढोकची अंडी खातात. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्यात माळढोक पक्ष्यासाठी संरक्षित अरण्य स्थापन झाले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी माळढोक पक्षी पाकिस्तानातून स्थलांतरित होऊन राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात येत असत. मात्र पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात माळढोकची शिकार करण्यात आली. तर काही स्थलांतर करताना मोठ्या वीज वाहिन्यांमध्ये अडकून मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे माळढोक पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.

“सोलापूर जिल्ह्यातील नाणज या अभयारण्यात तीन ते पाच माळढोक पक्षी शिल्लक राहिले आहेत. त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे माळढोक पक्ष्यांची अंडी कृत्रिमपणे उबविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यासह भारत सरकार काही ठिकाणी कृत्रिम ब्रीडिंग सेंटर तयार करणार आहे.”
डॉ. वासुदेव त्रिपाठी, शास्त्रज्ञ, प्रभारी अधिकारी, भारतीय प्राणी सर्वेक्षण

 माळढोक पक्ष्यांना रेडिओ कॉलर
महाराष्ट्रात फक्त तीन ते चार माळढोक पक्षी शिल्लक राहिले आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये पक्ष्यांना रेडिओ कॉलर लावण्याचा समावेश आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बरोबर काम करणारे व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रमोद पाटील हे माळढोक संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

 

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...