… आणि मुलाखतीची वेळ संपली 

.., आणि मुलाखतीची वेळ संपली 
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील मुलाखत कक्ष आधुनिक तरी परिस्थिती तशीच
पुणे . येरवडा  मध्यवर्ती कारागृहात सेंट्रल ॲड्रेसिंग सिस्टीम् (मध्यवर्ती ध्वनीक्षेपक यंत्रणा) आहे. कारागृहातील  सत्तर टक्के कच्चे कैदी आहेत. त्यामुळे एकाच वेळी ध्वनीक्षेपकावरुन त्यांच्यापर्यंत निरोप पोहचतो. त्यामुळे सकाळी दहा वाजता ज्या कैद्यांच्या नातेवाईकांची भेट होणार आहे, त्यांना ध्वनीक्षेपकावरुन मुलाखत कक्षाच्या बाहेर बोलावून रांगेत उभे केले जाते. त्यानंतर बाहेरील त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा बोलावून रांगेत उभे केले जाते.पूर्वी एका लहानशा खोलीत ही मुलाखत होत असे. कैदी व भेटण्यासाठी येणाऱ्यांमध्ये तारेची जाळी असायची. एकाच वेळी वीस ते तीसजण बोलत असल्यामुळे कोणाचे कोणाला ऐकू येत  नसायचे. एकमेकांच्या चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांतील अश्रू, देहबोली यावरुनच त्यांच्यामध्ये सुरू असलेला संवाद हा आनंदाचा आहे की दु:खाचा हे कळायचे. त्यांना क्रोध झाला आहे की पश्‍चाताप हे कळायचे. शब्द कानावर न पडताच त्यांच्यातील संवाद काय सुरु आहे हे कळायचे. काही मिनिटांतच तुरुंग रक्षक मोठ्या आवाजात मुलाखतीची वेळ संपल्याचे ओरडून सांगायचा. त्यामुळे संवाद न होताच  पुढील मुलाखतीला येण्याचे हातवारे करुन नातेवाईक व कैदी जात असत.
 येरवडा मध्यवर्ती कारागृहात  कैद्यांची संख्या साडेसहा हजारांहून अधिक झाली. राज्यातील सर्वाधिक कैदी संख्या असलेले येरवडा हे कारागृह आहे. या कारागृहात तब्बल साडेचार हजारांपेक्षा अधिक कच्चे कैदी आहेत. त्यामुळे त्यांना दररोज भेटण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांची संख्या सुद्धा शेकडोने असते. ही मुलाखत सकाळी दहा ते बारा व दुपारी तीन ते पाच दरम्यान असते. त्यामुळे कारागृहाच्या बाहेर कैद्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी असते. ता मुलाखत कक्षात कैदी आणि नातेवाईक यांच्यामध्ये अभेद्य ‘काच’ लावण्यात आली आहे. कैदी व त्यांच्या नातेवाईकांना बोलण्यासाठी स्पिकर व दूरध्वनीसारखी यंत्रणा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, कैदी संख्या पाहता आणि आलेल्या नातेवाईकांचा विचार करता काही क्षणातच ही मुलाखत संपते. या ठिकाणी कैद्यांची संख्या वाढल्याने मुलाखतीसाठी नातेवाईकांची प्रतिक्षा असते, म्हणून संवाद संपण्याच्या आधीच मुलाखतीची वेळ संपल्याची आरोळी तुरुंग रक्षक देतो.
      “ येरवडा मध्यवर्ती कारागृहातील आधुनिक मुलाखत कक्षात एकाच वेळी २२ कैदी व त्यांचे नातेवाईक संवाद साधु शकतात. आणखी दहा कैद्यांना संवाद साधता येईल अशी सोय करण्यात येणार आहे. प्रत्येक कैदी व त्याचे नातेवाईक यांना संवाद साधण्यासाठी दहा ते वीस मिमिटाचा कालावधी देण्यात येतो. नातेवाईक जास्त आल्यास मुलाखतीचा वेळ कमी केला जाऊ शकतो.”
– सुनिल ढमाल, अधिक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह
    येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्याला जामीन दिला तर त्यांना कोण सांभाळणार, यामुळे त्यांचे नातेवाईक त्यांना जामीनच देत नाही. त्यामुळे कारागृह हे कैद्यांचे कायमचे घर झाले आहे. अशा कैद्यांची संख्या लक्षणीय आहे. अशा कैद्यांना ना कोणी भेटायला येतात, ना कोणी पत्र पाठवतात. त्यामुळे कारागृहातील त्यांचे जीवन एकाकीच असते. मात्र, दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रमाला येरवडा परिसरातील शाळेतील मुली किंवा स्वयंसेवी संस्थेतील महिला त्यांना राखी बांधण्यासाठी येतात, हीच एक त्यांच्यासाठी दिलासा देणारी घटना म्हणावी लागेल. राख्या बांधताना त्यांना अश्रू आवरता येत नाही. अशा एक ना अनेक घटनांचा साक्षीदार येरवडा मध्यवर्ती कारागृह आहे.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...