कारागृहात मिळते अवेळी जेवण ; कारागृह भाग -२

कारागृह भाग २
 भारतीय माणसांची जेवणाची वेळ ही सकाळी दहा वाजता असली तरी रात्रीच्या जेवणाची वेळ ही सायंकाळी चार नसते. मात्र, ब्रिटीशांनी त्याकाळी पुरेशा वीजेची सोय नसल्यामुळे कदाचित सकाळी दहा व सायंकाळी चारची जेवणाची सोय केली असण्याची शक्यता आहे. देश स्वातंत्र झाल्यानंतरही ७५ वर्षांनी राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या जेवणाची वेळ ही सकाळी दहा व सायंकाळी चार ची आहे. त्यामुळे अनेक कैदी जेवण वाटपाच्यावेळी घेतात आणि त्यांच्या सोईने अर्थात भुक लागल्यानंतर खातात. कारागृहातील जेवण आधीच निकृष्ट दर्जाचे त्या मध्ये उशीरा जेवण केल्यामुळे ते थंड असते. कारागृहात त्यामुळे हंडी पद्धत आली आहे. ताटाचे भांडे करून त्यात जेवण गरज केले जाते. त्यामध्ये गरजे प्रमाणे मीठ, तिखट, तेल आणि फरसाण टाकून ते चविष्ट केले जाते.

कारागृहात मिळते अवेळी जेवण

कारागृहाची संकल्पना आज ही ब्रिटीशांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे सुरू आहे. कारागृहातील सकाळ पहाटे पाच वाजता सुरू होते. कैदी संख्या मोठी असल्यामुळे सकाळी आवरण्याची घाई सर्वांना असते. अतिशय अस्वच्छ शौचालय, अंघोळीसाठी हौद असतो. हौदातून बादलीत पाणी भरून चक्क अंगावर ओतून घ्यावे लागते. सकाळी मिळणाऱ्या चहा म्हणजे गरम पाण्यासारखा असतो. तर दुपारचे जेवण सकाळी दहा वाजता मिळते. जे पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान बनविलेले असते. तर संध्याकाळी चार वाजता मिळते ते दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान बनविलेले असते. हे जेवण अवेळी असल्यामुळे अनेक कैदी सकाळी दहा वाजता मिळालेले जेवण दुपारी एक ते दीड च्या दरम्यान खातात. तर संध्याकाळी मिळालेले जेवण ते साडेसात ते आठच्या दरम्यान खातात.

जेवण गरम करण्यासाठी हंडी पद्धत

कैद्यांना मिळणारे जेवण हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असते हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे अनेक कैद्यांकडे तिखट, मीठ, तेल , फरसाण आदी वस्तूंचा साठा असतो. जेवणाचे ताटाला ते भांड्याचा आकार देतात. त्याला हंडी म्हणतात. कैदी वाटी घेऊन त्यात वृत्तपत्राची रद्दी व प्लॅस्टिकचा वापर करून आग पेटवतात. या वाटीवर हंडी ठेवतात. या हंडीत कारागृहात मिळालेली भाजी गरम करतात. त्यात गरजे प्रमाणे तिखट, मिठ, तेल व फरसाण घालून गरम करतात. शक्य असल्यास कागदाप्रमाणे व अर्धी कच्ची मिळालेल्या चपात्या गरम करून खातात. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच कैद्यांना हंडी पद्धतीने खाता येते. इतर असंख्य कैद्यांना कारागृहातील निकृष्ट जेवण खावे लागते. कारागृहातील ‘भांडार’ अर्थात सुपर मार्ट
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील भांडार अर्थात सुपर मार्ट आहे. या भांडारात कैद्यांना पाहिजे ती वस्तू सहज मिळते. अर्थात कैद्यांना अव्वाच्या सव्वा रक्कम मोजावी लागते. या ठिकाणी कैद्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू अर्थात अंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी साबण, टुथ पेस्ट, खोबऱ्याचे तेल किंवा बेकरी उत्पादने, उखडलेली अंडी, दुध, तंबाखु, सिगारेट पर्यंत सर्व वस्तू मिळतात. त्या पाहिजे असल्यास चढ्या दराने विकत घ्यावे लागतात. येथील सर्व नोंदी लेखी असल्यामुळे भ्रष्टाचाराचा कळस असतो. ही यंत्रणा खालच्या अधिकारापासून ते मंत्रालयातील सचिव स्तरापर्यंत पोखरलेली आहे. दैनंदिन कैद्यांना मिळणाऱ्या चहा पासून ते जेवणा पर्यंतच्या वस्तूंमध्ये ‘मापात पाप’ करून कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार होत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर किती धान्य, कडधान्य, किराणा माल, तेल, दूध, तिखटापासून ते मिठापर्यंत येत किती वापरले जाते याचे काहीच प्रमाण नाही. प्रमाण असले तरी ते काटेकारेपणे तपासले जात नाही. त्यामुळे कैदी कधीच तक्रार करीत नाहीत. एखाद्याने केल्यास त्याला वेगळी शिक्षा कारागृहात भोगावी लागते. त्यामुळे सर्वजण गप्प असतात.

मनीऑर्डर मध्ये भ्रष्टाचार

कारागृहातील परिस्थिती भयंकर असल्यामुळे येथे जगायचे तर पैसे हवेत म्हणून अनेक कैदी मनीऑर्डर मागवत असतात. या मनीऑर्डर मध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्याला हजार रूपये मनीऑर्डर आली तर त्याच्या पर्यंत चारशे ते पाचशे रूपये पोहचतात. या बाबत तक्रार केली तर पुढच्या वेळी मनीऑर्डर बंद केली जाते. आता कारागृहात नवीन डिजीटल प्रणाली आल्यामुळे रोकड पैशांचा वापर कमी झाला आहे. तरी सुद्धा कैद्यांचे आर्थिक शोषण येथे होत असते.

कारागृहातील आरोग्य सुविधा

येरवडा मध्यवर्ती कारागृहात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचर आहेत. त्यामुळे दैनंदिन आजारापासून ते साथीच्या आजारावर कैद्यांवर तत्काळ उपचार केले जातात. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शिफारशीवरच असून सारख्या रुग्णालयात कैद्यांना उपचारासाठी पाठविले जाते. या शिफारसीसाठी सुद्धा मोठी आर्थिक देवाण-घेवाण होत असते. त्यामुळे येथे सुद्धा गरीब आणि श्रीमंताचे उपचार वेगळे आहेत. ज्याच्याकडे पैसा त्यांना तत्काळ व चांगले उपचार तर गरीबांना उपचारासाठी प्रतिक्षा करावी लागते.

Leave a reply

Recent Comments

No comments to show.
Deal Of The Month
    Categories
    Loading Next Post...
    Follow
    Search Trending
    Loading

    Signing-in 3 seconds...

    Signing-up 3 seconds...